Saturday, November 14, 2009

कादिरला मारलेला तो षटकार!

वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय संघात दाखल झालेल्या सचिनने पदार्पणापासूनच आपल्या कामगिरीचा आलेख चढता ठेवला आहे तो जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर! आजही प्रत्येक सामन्यात शतकी खेळीच्या प्रयत्नात असणाऱ्या सचिनची धावांची भूक आजही भागलेली नाही।भारतीय संघ १९८९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सचिनची टीममध्ये एन्ट्री झाली होती...भारतीय संघ सरावासाठी नेटस्मध्ये यायचा, त्यावेळी अवघे साडेसोळा वर्ष वय असणारा हा खेळाडू जीव ओतून खेळायचा... नेटस्मधल्या सरावात फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही तो इतका रमायचा की त्याला तिथून बाहेर काढणे त्यावेळी अवघड होऊन जायचं. मॅच सुरू असताना सलील अंकोलाच्या साथीने ड्रेसिंगरुमच्या मागील बाजूस सचिन सराव करत राहायचा.
याचदरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या सामन्यात सचिन होता. पाकिस्तानचा नामवंत लेगस्पिनर अब्दुल कादिर खेळत असल्यामुळे कुठल्याही नवख्या फलंदाजावर दबाव आला असता. पण, सचिन बॅटिंग करण्यासाठी मैदानात गेला आणि कादिर छोटा वाटला! कादिरच्या हातभर वळलेल्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकत ड्रेसिंगरूमची काच फोडली तेव्हा सर्वांच्या तोंडाचा चंबू झाला होता... आजही माझ्या मनात ही आठवण ताजी आहे.
या दौऱ्यातील सियालकोटच्या कसोटीत सचिनला संघात घेतलं होतं. सियालकोटची विकेट जलदगती गोलंदाजाना अनुकूल अशीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे पाक संघातल्या इम्रान खान, वकार युनुस, वसिम अक्रम या गोलंदाजाना त्याचा फायदा होणार हे निश्चित होते.

पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सचिनच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेश दिसला नाही. वकारने टाकलेला पहिलाच बाऊन्सर चेंडू त्याच्या तोंडावर बसला आणि नाकातून रक्त वाहू लागले. फिजीओथेरपिस्टने उपचार केल्यानंतर सचिन पुन्हा मैदानात उतरला. वकारच्या पुढच्या तीनही चेंडूवर सचिनने चौकार लगावले. त्याचवेळी हा खेळाडू भारतीय संघाचा दमदार फलंदाज म्हणून नावारुपाला येईल, अशी माझी खात्री झाली.

२००७ मध्ये भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर गेला तेव्हा पुन्हा एकदा मॅनेजरपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या दौऱ्यातही सचिनने अप्रतिम कामगिरी केली मात्र तीनदा त्याला चुकीच्या पध्दतीने बाद देण्यात आल्यामुळे त्याची तीन शतके हुकली.

सीनियर खेळाडूंबद्दल सचिनच्या मनात अतीव आदर आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरवसोहळ्याला तो आवर्जून हजर राहिला... हे मी कधीच विसरणार नाही.


No comments:

Post a Comment